औरंगाबाद – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात शिक्षण मंत्री आणि औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे माजी आमदार राजेंद्र दर्डा २०१४ मध्ये पराभूत झाल्यानंतर सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले होते. २१ नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण शहरात त्यांच्या शुभेच्छांचे होर्डिंग लागले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला त्यांचा वाढदिवस हा त्यांच्या राजकारणातील कमबॅकची नांदी तर नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
होर्डिंगवर लिहिले सुचक वाक्य
माजी मंत्री दर्डा हे २०१४ पासून
काँग्रेसच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. राजकारणापासून ते
दोन हात लांबच राहात असलेले गेल्या चार वर्षांत पाहायला मिळाले. बुधवारी ते ६६वा
वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने साधारण आठवडाभरापासून त्यांना शुभेच्छा
देणारे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे होर्डिंग शहरातील
मुख्य रस्तांवर झळकले आहेत.
शहरात लागलेल्या होर्डिंगवर सुचक वाक्य आहे, त्यामुळे माजी मंत्री दर्डा पुन्हा औरंगाबादच्या राजकारणात सक्रिय होत आहेत का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ‘बहुआयामी व्यक्तिमत्व बाबुजी’ अशा आशयाचा मजकुर त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने लावण्यात आलेल्या होर्डिंगवर आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये हे होर्डींग पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात सकाळपासूनच शुभेच्छा देणाऱ्यांची रिघ लागली आहे.
‘एमआयएम’ने मारली होती मुसंडी
माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचा
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत दारुन पराभव झाला होता. भाजपचे अतुल सावे आणि ‘एमआयएम’चे डॉ. गफ्फार
कादरी यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. या लढतीत दर्डा यांचा पराभव झाला होता.
हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी काँग्रेसच्या सर्वाच कार्यक्रमांवर
एक प्रकारे बहिष्कार टाकला होता. अनेक मोठ्या सभा, कार्यक्रमात माजी
मंत्री दर्डांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत होती. मध्यंतरी
ते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनाही उधान आले होते. त्यामुळे दर्डा हे
काँग्रेसला रामराम ठोकून सत्ताधारी भाजपसोबत जाणार का, अशीही चर्चा राजकीय
वर्तुळात रंगली होती. आता आगामी लोकसभा, विधानसभेच्या तोंडावर दर्डांचे शहरात झळकत
असलेले होर्डिंग हे त्यांच्या राजकारणाच्या पुनश्च हरि ओमचे संकेत देत आहेत. यासंबंधी ‘सांजवार्ता ऑनलाईन’ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
केला, परंतू यावर त्यांची प्रतिक्रिया कळू शकलेली नाही.
वाढदिवसानिमित्त किर्तनाचा कार्यक्रम दरवर्षी
राजेंद्र दर्डा यांचे कट्टर समर्थक असलेले बबन डिडोरे हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गजानन महाराज मंदिर परिसरातील मैदानावर किर्तन अयोजित करत असतात. यावर्षीही त्यांनी किर्तनाचे आयोजन केले असून किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. दुसरीकडे, दर्डा यांचे मित्र आणि समर्थकांनी शहरातील चौकाचौकात होर्डिंगलावून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सिडकोतील वसंतराव नाईक चौक, सेव्हन हिल, सिल्लेखाना चौक या ठिकाणचे होर्डिंग पाहणाऱ्यांच्या लक्ष वेधून घेत आहे.